पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक २४ तास कार्यान्वित

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती तपासणी देखील करण्यात येत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सर्व निवारा केंद्रांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथक २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत १६ पथके तयार केलेली असून यापथकांमार्फत या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत. पूरपरिस्थिती व ठिकठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे एम.पी.डब्ल्यु, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत पुरबाधित परिसरामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जनजागृती व आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. तसेच जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस एक तास आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे पाणि साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी, असे आवाहन देखील वैद्यकिय विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. तरीही, नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.













