चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दहा दिवसांच्या गणरायाला बाप्पा मोरयाचा जयघोष करत चिंचवडकरांनी मंगळवारी निरोप दिला. सार्वजनिक गणेश मंडळे व हजारो घरगुती गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले.
थेरगावजवळील विसर्जन घाटावर व मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. विसर्जन घाटावर सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. विसर्जन मार्गावर व घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन घाटावर महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी केली होती.
दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.
आनंदनगर येथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर आठच्या सुमारास आनंदनगर मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी,संबळवादक सहभागी झाले होते.
श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आरंभ ढोल ताशा पथक , बालवारकरी सहभागी झाले होते. विठ्ठलाचा रथ साकारला होता. तरुण मित्र मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत पालखीतून मिरवणूक काढली. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या मिरवणुकीत शिवदर्शन ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. श्रीराम मोरया दरबार देखाव्याचा चित्ररथ साकारला होता. मुंजोबा मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘रामरथ’ साकारला आहे. ‘पवनामाई आमची माता, आम्हीच तिचे रक्षणकर्ता’ असे मजकूर असलेला फलक लावता नदी संवर्धनाचा संदेश दिला. गजाक्ष ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. ज्ञाप्रबोधिनीच्या १५० मुलांच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.
सायंकाळी विसर्जनासाठी गर्दी वाढत गेली.विसर्जन घाटावर अनेकांनी या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. निर्माल्य दानासाठी पालिका प्रशासन व सेवाभावी संस्थानी भाविकांना नदी पात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन केले. चिंचवड वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी बंदोबस्त देत होते.