पीसीयु – आयएसटीडीमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

तंत्रज्ञानाच्या युगात रोजगार संधीत बदल – बृजमोहन मिश्रा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वच क्षेत्रांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक क्षेत्रातही होत असून त्यामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या उपलब्धतेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करून उपलब्ध रोजगार संधी शोधल्या पाहिजेत, असे प्रतिपादन इंडियन सोसायटी ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, पुणे चॅप्टरचे (आयएसटीडी) अध्यक्ष बृजमोहन मिश्रा यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि आयएसटीडी यांच्या मध्ये सोमवारी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी पीसीयुचे प्र- कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज आणि बृजमोहन मिश्रा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पीसीईटी कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी आदी उपस्थित होते.
मानव संसाधन विकासाच्या उद्देशाने आयएसटीडीची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली. संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कार्यरत आहे. जिनेव्हामधील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (आयएफटीडीओ) आणि मनिला मधील आशियाई प्रादेशिक प्रशिक्षण आणि विकास संस्था (एआरटीडीओ) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता आहे. या करारामुळे औद्योगिक क्षेत्रातून कुशल मनुष्यबळ मागणी व विकास, औद्योगिक कंपन्यांना भेटी, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. याचा फायदा विद्यार्थी, प्राध्यापकांना होईल असे प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.














