ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपळे सौदागर येथील लष्कर हद्दीलगतच्या रस्त्याचे काम खोळंबले

Spread the love

 

रस्त्याच्या बदल्यात प्रतिपुर्ती करण्यास महापालिकेची चालढकल?..

भूमिपुत्रांनी प्रशासनावर व्यक्त केली नाराजी

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका प्रभाग २८ मधील पिंपळे सौदागर येथील लष्कर हद्दीची जागा ताब्यात दिल्यानंतरही त्याची प्रतिपुर्ती करण्यास अधिकारी चालढकल करीत आहेत. यामुळे नॅचरल आईस्कीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटी पर्यंत १८ मीटर सिमेंट रस्त्याच्या कामाला निविदा काढूनही खो बसला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करुन लष्कर हद्दीची जागा ताब्यात घेण्यास योगदान देणा-या भूमिपुत्रांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

कासारवाडी ते कोकणे चौक मार्गे शिवार चौक व पुढे जगताप डेअरी मार्गे पुणे, हिंजवडी आणि रावेत भागात जाणारा हा मार्ग पिंपळे सौदागर येथील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच रहदारी होत असल्याने पीके चौक, कोकणे चौक आणि शिवार चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी नॅचरल आईस्क्रीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटी हा ९२० मीटर लांबीचा १८ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यासाठी जागेचा ताबा देण्यास लष्कराकडून प्रतिसाद मिळत नव्हता. स्थानिक नागरिकांनी लष्कराची जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दिल्लीपर्यंत पाठपुरावा करुन रितसर पत्रव्यवहार केल्यानंतर जागा हस्तांतरण करण्यास संरक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, लष्कर हद्दीतील जागेच्या आर्थिक मुल्याधारित रक्कमेची महापालिकेने प्रतिपुर्ती करण्याचा निर्णय लष्कर अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, त्यानंतर जागेच्या मुल्याधारित रक्कमेची कामे महापालिकेने करुन द्यावीत, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महापालिकेने सुमारे ३० कोटींची लष्कर हद्दीतील कामे करुन द्यावयाची आहेत. परंतु, त्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्यामुळे रस्त्याचे विकास काम लष्कर विभागाने थांबवले आहे.

निविदा कोणाच्या भल्यासाठी ?

नॅचरल आईस्कीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटीपर्यंत ९० मीटर लांबी व १८ मीटर रुंद सिमेंट रस्ता केला जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने १४ कोटी ८२ लाख ८८ हजार रुपये खर्चाची निविदा ऑक्टोबर २०२३ मध्ये काढली. आता लष्कर विभागाकडून हे काम करु दिले जात नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. याचा अंदाज होता तर मग कोणाच्या भल्यासाठी निविदा काढली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

बीआरटी रस्ता ते ट्रॉईज सोसायटी १८ मीटर सिमेंट रस्त्याची जागा हस्तांतरण प्रक्रिया चार महिन्यापूर्वी पार पडली. महापालिका अधिकारी आणि संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने निर्णय झाला. संरक्षण खात्याकडून रस्त्याचे काम सुरु करण्यास हिरवा कंदील दिला गेला. तरी, पालिका स्तरावर पाऊले उलचली जात नसतील तर आता दाद मागायची कोणाकडे हा प्रश्‍न आहे.

– संदीप काटे, भूमिपुत्र..

लष्कर हद्दीतील जागेची प्रतिपुर्ती करण्यास काही तांत्रिक कारणामुळे विलंब होत आहे. यामुळे काम सुरु करण्यास अडचणी येत आहेत. नगररचना व विकास विभागाशी समन्वय साधून हा प्रश्‍न चर्चेअंती मार्गी लावली जाईल.

– देवान्ना गट्टूवार,
कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका…

लष्कर विभागाकडून आठरा मीटर रस्त्याची जागा ताब्यात आलेली आहे. जागेच्या बदल्यात सुमारे ३० कोटींची कामे करुन द्यावी लागणार आहेत. त्यासंदर्भात १५ मार्च रोजी संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत नियोजित बैठक आहे. यावेळी हा प्रश्‍न मार्गी लागेल.

-अशोक कुटे, उपभियंता, नगररचना विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button