पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी – डॉ.कुंदा भिसे

पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी : उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे यांची भाजप शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप यांच्याकडे मागणी.
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सततच्या पावसामुळे पिंपळे सौदागर ते हिंजवडी दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्याची स्थिती आहे.पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदा भिसे यांनी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खराब रस्त्यांमुळे दररोज ये-जा करणाऱ्या आय.टी. अभियंते आणि नागरिकांना ट्रॅफिक समस्या , खडयांमुळे उद्भवणाऱ्या ‘स्पॉंडेलिसिस’ / मणका विकार ‘ , वाहनांचे नुकसान यांसारख्या समस्यांना दैनंदिन स्वरूपात सामोरे जावे लागत आहे.
आजमितीला ७० हजार ते १ लाख पर्यंत आय.टी. अभियंते या मार्गाचा वापर करतात. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ४० मिनिटांच्या प्रवासाला तब्बल २ तासांचा वेळ लागत आहे.
याबाबत सर्व हिंजवडी आय.टी.अभियंते यांच्यातर्फे अतुल पाटील , भूषण कोटेकर , विरेंद्र पाटील यांनी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे यांना निवेदन देण्यात आले होते. आणि याबाबत मा.शंकरभाऊ जगताप यांच्यामार्फत रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. डॉ.कुंदा भिसे यांनी याबाबत पुढाकार घेऊन आय.टी. अभियंत्यांच्या समस्या शंकरभाऊ जगताप यांच्या पर्यंत पोहोचवल्या. शंकरभाऊ यांनी , बी.आर.टी. चे काम प्रगतीपथावर असल्याने आवश्यक ठिकाणी रस्ताची कामे रेंगाळत असल्याचे सांगितले , तरीसुद्धा ; सदर कामे वेगाने मार्गी लावून नागरिकांना जलद दिलासा देण्यात येईल आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदा भिसे , संस्थापक संजय भिसे , अतुल पाटील , भूषण कोटेकर , विरेंद्र पाटील यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य , विठाई वाचनालयाचे सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक , पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












