चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी विधानसभेत घुमणार कष्टकऱ्यांचा आवाज – कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे निवडणूक लढविणार

– पिंपरीतील बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आग्रह
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दीड लाख लोकसंख्या असलेल्या टपरी, पथारी, हातगाडी, धारक धुणी -भांडी महिला कामगार, रिक्षा चालक यांचा आवाज पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत घुमणार आहे. बाबा कांबळे हे पिंपरी विधानसभेतून निवडणुकीला उभा राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्धार त्यांनी केला आहे.
पिंपरी येथे कष्टकरी कामगार पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी, घरकाम महिला कामगार, रिक्षा चालक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी बाबा कांबळे यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.
यावेळी रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, शहराध्यक्ष संतोष गुंड, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे उपाध्यक्ष अनिल गाडे सरचिटणीस मधुरा डांगे, राजू साहू, टपरी पथारी हातगाडी पंचायत दामोदर मांजरे, प्रकाश यशवंते हे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात कष्टकरी कामगार पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी, धुणी- भांडी महिला कामगार, रिक्षा चालक त्यांची संख्या दीड लाखाच्या पुढे आहे. शहरात आरटीओ कार्यालय अंतर्गत चाळीस हजार पेक्षा अधिक रिक्षाचालकांची नोंद आहे. वीस हजारांपेक्षा अधिक टपरी पथारी हातगाडीधारक आहेत. तर धुणी-भांडी, बांधकाम मजूर, कष्टकरी जनतेची संख्या वीस हजारांपेक्षा अधिक आहे. या घटकांचे अनेक प्रश्न आजही सोडवले जात नाही. राजकीय लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनावर बोळवण करत आहे.
सद्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य कष्टकऱ्यांना केवळ आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसली जातात. गेल्या निवडणुकीत कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन मदत केली होती. मात्र त्या बदल्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कष्टकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. कष्टकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात शासन आणि प्रशासन उदासीनता दाखवत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर केवळ गृहीत धरले जात आहे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कष्टकऱ्यांचा आवाज पिंपरी विधानसभेत घुमावा यासाठी बाबा कांबळे यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर बाबा कांबळे यांनी पिंपरी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
चौकट : या ठिकाणी देणार आव्हान –
पिंपरी विधानसभेतून बाबा कांबळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर चिंचवड, भोसरी, मावळ आणि खेड आळंदी तसेच इतरही मतदार संघ येथूनही संघटनेचे उमेदवार उभे करून प्रस्थापितांना आव्हान देणार आहेत. या सर्व मतदारसंघात एक लाखांपेक्षा अधिक संघटनेचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.
दर निवडणुकीत कष्टकऱ्यांना केवळ गृहीत धरण्याचे काम राजकीय लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही प्रत्येक निवडणुकीत मदत केली. मात्र त्या बदल्यात कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर मी पिंपरी विधानसभा लढविणार आहे. तसेच इतर मतदारसंघातही उमेदवार उभे करणार आहोत.
– बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत.













