ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरात कॉलराचे ४ नवीन रुग्ण

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दूषित व गढूळ पाणीपुरवठा झाल्याने भोसरी परिसरातील तीन रुग्णांना पटकीची (कॉलरा) लागण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.४) चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर वायसीएम आणि भोसरी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली असून सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दूषित पाणीपुरवठा होऊन संबंधित परिसरातील रुग्णांना कॉलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने दोन सदस्य असलेल्या ४४ पथकांमार्फत घरोघरी साथरोगाचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत ९७०५ घरांमधून २६ हजार ५५१ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. संशयित नागरिकांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना ओआरएस व औषधांचे वाटप केले आहे. तसेच महापालिकेकडून सर्व्हेक्षण सुरू केले आहे.
संशयित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने धावडे वस्तीतील भैरवनाथ शाळेत फील्ड रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. तेथे संशयित रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास भोसरी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. नागरिकांना याविषयी माहिती व्हावी, यासाठी परिसरात पथनाट्य तसेच रिक्षावर स्पीकर लावून जनजागृती करण्यात येत आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य-वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button