पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर – महापालिका प्रशासनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जाब!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दीड महिन्यापासून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
या परिस्थितीचा आढावा घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे युवक पदाधिकारी मंगेश असवले यांनी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन जाब विचारला आणि तातडीने कारवाईची मागणी केली.
महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुले, महिला, वृद्ध आणि दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. काही ठिकाणी गंभीर जखमा होण्याच्या घटना घडल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रेबीज आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.
महापालिकेने वेळोवेळी कुत्र्यांच्या धरपकडीसाठी आणि नसबंदी मोहिमेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असल्याचे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा काहीही फायदा होत नाही. उलट, समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिकेला ठरवलेल्या मागण्या:
शहरभर भटक्या कुत्र्यांची तातडीने धरपकड सुरू करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष टास्क फोर्स तयार करावा. नियमित लसीकरण व नसबंदी मोहिम सुरू करावी. शहरातील प्रमुख भागांमध्ये कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने व फीडिंग झोन तयार करावेत. नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ तास कार्यरत हेल्पलाईन सुरू करावी.युवक पदाधिकारी मंगेश असवले यांनी महापालिकेला जर ठोस कारवाई नाही झाली, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
“महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. केवळ आश्वासनांवर वेळ न दवडता तातडीने ठोस कारवाई करावी. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाग आणू..!” – मंगेश असवले, युवक पदाधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष.













