पारितोषिक मिळणे म्हणजे गुणवत्ता सिद्ध करणे – स्वाती महाळंक

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात पारितोषिक मिळणे म्हणजे आपण गुणवत्ता सिद्ध करणे होय. पण ही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यात जिद्द, चिकाटीला पर्याय नाही. युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमावर अधिकाधिक भर द्यायला हवा. काळाची पाऊले ओळखून येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन आपल्यातील क्षमता सिद्ध करायला हव्यात,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व निवेदिका स्वाती महाळंक यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आधुनिक युगातील
समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास साधता येईल. यु-ट्युबसारख्या माध्यमाकडे युवकांनी आर्थिक स्त्रोत म्हणूनही पाहायला हरकत नाही. तथापि त्याचे तंत्र जाणून घेतले पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे होते. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रयोगशाळा आहे. सातत्याने नाविन्याचा ध्यास हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठीत अंशकालीन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. शाखाप्रमुखांनाही संस्थेने स्वातंत्र्य दिल्याने बदलत्या काळाला अनुसरून विविध क्षेत्राशी निगडित अंशकालीन अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु झाले आहेत. त्याचा उपयोग करून अनेक विद्यार्थ्या स्वयंरोजगार सुरू करून आर्थिक सक्षम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ‘नॅक’कडून महाविद्यालयास ‘ए ++’ मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य व शिक्षकेतर सेवकांचे विशेष कौतुक केले. आणि अखेरी जीवनात यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रमाला पर्याय नाही, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर डॉ. माधव सरोदे यांनी केले. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील विविध उपक्रम, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, वार्षिक अंक ‘शाल्मली’ला मिळालेले पुरस्कार, कला, क्रीडा विभागात यशस्वी झालेले विद्यार्थी यांचा लेखाजोखा कार्याध्यक्ष उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे यांनी मांडला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. विशाल मासुळकर, सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे, धम्मराज साळवे, प्रबोधनकार श्रीमती शारदाताई मुंडे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डॉ. दत्तात्रय हिंगणे, पर्यवेक्षक श्रीमती रूपाली जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती शारदा शेटे, डॉ. नीलकंठ डहाळे, प्राध्यापक. शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. पांडुरंग लोहोटे, प्रा. गणेश भांगरे, प्रोफेसर डॉ. भारती यादव, उपप्राचार्य प्रा. अनिकेत खत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सोनल बावकर यांनी केले.













