पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिलला रामटेक येथे पहिली जाहीर सभा होणार भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची माहिती

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल, असेही दरेकर म्हणाले.
निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, भाजपा हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्ध, कालबद्ध आणि समयसूचक काम करणारा पक्ष आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीत अत्यंत महत्वाची भुमिका निभावत असते. आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्युहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होतेय याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकेकावर जबाबदारी देण्यात आली आहे.
उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणुकच लढवायची असेल तर अशा प्रकारची भुमिका अनेक लोकं अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिक उन्मेश पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेलेच उचलावे लागणार आहे. स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उबाठा सेनेच्या उमेदवारांवर नजर टाकली तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत. रिकाम्या जागा भरण्याचा उबाठा सेनेचा प्रयत्न असल्याची बोचरी टिकाही दरेकरांनी केली.
विरोधकांना टोला लगावताना दरेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची काल परभणी येथे सभा झाली. त्या सभेत सांगण्यात आले की कुणाचा बापही संविधान बदलणार नाही. एवढे संविधान आपले पवित्र, ताकदवान आहे. परंतु विरोधकांकडे निवडणुकीला मुद्देच राहिले नाहीत. मोदींच्या कर्तृत्वावर, विकासकामांवर, देशाच्या प्रगतीवर बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. जनतेच्या प्रश्नाबाबत बोलत नाहीत. केवळ भावनिक वातावरण करता येते का? अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
*संविधानाची प्रतिष्ठा वाढविण्याचे*
*काम आमच्याच केंद्र सरकारने केलेय*
दरेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा जाहीर सभेतून सांगितले आहे की, कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. जी गोष्टच होणार नाही ती पुन्हा पुन्हा बोलायची, दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा परंतु तो यशस्वी होणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपने संविधानाचा जेवढा सन्मान केलाय तेवढा आतापर्यंत कुणीही केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा उदोउदो करण्याचे काम, संविधानाची प्रतिष्ठा आणखी वाढविण्याचे काम आमच्याच केंद्र सरकारने केलेय याची आठवणही दरेकरांनी यावेळी विरोधकांना करून दिली.













