चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“देशाच्या प्रगतीत नारीशक्तीचा मोठा वाटा!” – खासदार श्रीरंग बारणे

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आपल्या देशाच्या प्रगतीत नारीशक्तीचा मोठा वाटा आहे!” असे गौरवोद्गार खासदार श्रीरंग बारणे यांनी श्री केदारेश्वर मंदिर, पेठ क्रमांक २४, प्राधिकरण येथे काढले. महाशिवरात्री महोत्सव आणि जागतिक महिला दिनानिमित्त बारणे यांच्या हस्ते महाआरती आणि महिला सन्मान सोहळ्याचे श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे या मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, “महिला चार भिंतीत राहून प्रपंच चालवते. घरातील प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ठामपणे उभी राहते; त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत राहून देशाच्या प्रगतीला हातभार लावते. जेव्हा जेव्हा आपल्या देशातील संस्कृती कोलमडून पडण्याची वेळ आली; तेव्हा तेव्हा नारीशक्तीमुळे ती अखंडित राहिली. राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले अशा असंख्य महिलांच्या योगदानामुळे वेगवेगळ्या कालखंडात महिला या वंदनीय ठरल्या आहेत. त्यामुळे केवळ जागतिक महिलादिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण नारीशक्तीचा सन्मान केला पाहिजे!” यावेळी भगवा फेटा आणि मोतिया रंगातील सुमारे १५१ महिलांनी मान्यवरांचे स्वागत केले.
महाशिवरात्री सोहळा २०२४ या उपक्रमांतर्गत पहाटे ०५:३० वाजता व्यासगुरुजी यांच्या हस्ते रुद्राभिषेक, सकाळी ०८:०० वाजता आरती, दुपारी ०१:०० वाजता प्राधिकरणातील स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ प्रस्तुत ‘स्वर भजन’ , दुपारी ०२:३० वाजता पवनसुत भजनी मंडळ प्रस्तुत ‘भक्ती भजन’ , दुपारी ०४:३० वाजता स्वयंभू रामेश्वर प्रासादिक भजनी मंडळ प्रस्तुत ‘पंचपदी भजन’ , सायंकाळी ०६:०० वाजता कलारंजनी संगीत विद्यालय प्रस्तुत ‘सत्यम् शिवम् सुंदरा…’ ही भावगीतांची मैफल, रात्री ०७:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती, रात्री ०८:०० वाजता स्थानिक कलाकारांनी सादर केलेली ‘भक्तिसंगीत माला’ , रात्री ११:०० ते पहाटे ०५ या कालावधीत शिवरात्री जागरण आणि चार प्रहर पूजा असे सुमारे चोवीस तासांचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. याशिवाय सकाळी ०९:३० वाजता रक्तदान शिबिर, सायंकाळी ०५:०० वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या संपूर्ण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होती. चक्रव्यूह मित्रमंडळ तसेच श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट कार्यकारिणी यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button