दापोडी पोलीस स्टेशनतर्फे नवीन फौजदारी कायद्यांवरील विशेष कार्यशाळा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी पोलीस स्टेशनतर्फे भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अॅड. मंगेश खराबे हे कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत भारतीय न्याय संहिते मधील गुन्हे म्हणजेच बलात्कार, मॉब लिंचिंग, देशविरोधी कृत्यांसाठी कडक शिक्षा, हिट-अँड-रन प्रकरणांवरील कठोर कारवाई, ई-एफआयआर आणि डिजिटल तपास प्रक्रिया, साक्षीदार संरक्षण आणि डिजिटल पुराव्यांना अधिकृत मान्यता यांसारख्या नवीन तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पंकज महाजन, दीपक कांबळे, गणेश देशमुख, तसेच पोलीस हवालदार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे अॅड. आकाश कांबळे, अॅड. विलास मोरे, अॅड. कैलास बनसोडे, संतोष राजपूत, सुरेश निकाळजे, तसेच वैभव सालार, निमिषा खुले, अनुषा खैरनार, ज्येष्ठ नागरिक, मोहल्ला कमिटी, दक्षता कमिटी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे आणि संपूर्ण दापोडी पोलीस स्टेशनचे आभार मानण्यात आले.













