दहा वर्षातील कारभाराने पिंपरी चिंचवडचे नाव महाराष्ट्रभर मलीन झाले – अजित गव्हाणे

– भोसरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद
भोसरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या दहा वर्षातील भोसरी विधानसभेमधील विद्यमान आमदारांचा कारभार पाहिला तर ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून दिले गेलेले टेंडर, फुगवलेले एस्टिमेट आणि त्यातून ढासळलेली कामाची गुणवत्ता हेच दिसून येईल. अगदी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामात कामाची हीच ढासळलेली गुणवत्ता दिसून आली. महाविकास आघाडीने हा मुद्दा समोर आणला. मात्र या सर्व कारभारावर महाराष्ट्र भर पिंपरी चिंचवडचे नाव मलीन झाल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी येथील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली.
महाविकास आघाडीने भोसरी पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये अनुक्रमे भोसरी मधून अजित गव्हाणे पिंपरी येथून सुलक्षणा धर आणि चिंचवड येथे राहुल कलाटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. यापैकी अजित गव्हाणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. गव्हाणे यांचा अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा धर आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे ,काँग्रेसचे गौतम अरगडे, नरेंद्र बनसोडे, धर्मराज साळवे आदी उपस्थित होते.
यावेळी गव्हाणे म्हणाले गेल्या दहा वर्षाचा शहरातील कारभार पाहिल्यानंतर शहराची घडी विस्कटलेली दिसून येते. प्रत्येक कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. टेंडर फुगवण्यात आलेले आहेत. आपल्याच लोकांना टेंडर कसे मिळेल. ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून कामांचे वाटप कसे होईल हेच गेल्या दहा वर्षात पाहिले गेले. त्यामुळे कामाची गुणवत्ता कोणत्याही कामात राखलेली नाही. छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीत देखील आपल्याला हेच दिसून आले. आम्ही त्या विरोधात आवाज उठवला. खरे चित्र जनतेसमोर ठेवले. विकासाचा बागुलबुवा करून उगाचच जे खोटे चित्र रंगवण्यात आले आले आहे. त्याचे खरे स्वरूप जनतेसमोर आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आणणार आहोत. या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवडचे नाव मलिन करण्याचे काम भोसरीच्या आमदारांनी केले आहे.
एकत्रित निवडणुकीला सामोरे
शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये आम्ही एकत्रपणे, एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्यात कुठलेही मतभेद नाही. दोन दिवसात सगळे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येतील. असेही अजित गव्हाणे यावेळी म्हणाले.
………














