दहावीत नापास तर बारावीला कनिष्ठ महाविद्यालयात दुसरा प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांनी उलगडला आपला शालेय जीवन प्रवास

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू इंग्लिश स्कूल, माण मुळशी येथील शाळेत नुकतीच पालक- विद्यार्थी सभा झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोडे होते. प्रमुख अतिथी स्वाधार परिवाराच्या अनधा गुप्ते ,प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, सामाजिक कार्यकर्ते तेजस कुंभार व्यासपीठावर होते.
याप्रसंगी उर्मी संस्थेचे मिलिंद जोरी, स्वाधारच्या श्रद्धा पवार, शीतल कलशेट्टी, ज्योती गायकवाड, लता सणस, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले.. “विद्यार्थी मित्रांनो! मीही तुमच्यासारखा एकेकाळी शालेय विद्यार्थी होतो. दहावीच्या महत्वाच्या परीक्षेत नापास झालो खरा पण या अपयशाने डगमगलो नाही तर जिद्दीने अभ्यास केला. याची परिणीती मी बारावीला कनिष्ठ महाविद्यालयात दुसरा आलो. विद्यार्थी मित्रांनो! आपणही यश आणि अपयश याकडे न पाहता मनःपूर्वक अभ्यास करून परीक्षा द्यावी.”
कोकणी भाषेतील गेय कविता सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.
सुरेश कंक यांनी विद्यार्थ्यांना समजेल उमजेल या भाषेत रक्तदान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा ,पर्यावरण यावरच्या कविता सादर करून ‘आयुष्यात एक तरी झाड लावावे.’ असे आवाहन केले.
कंक यांनी न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले वडील वै. मुरलीधर शिवराम कंक ( मास्तर) यांच्या नावे दरवर्षी एस एस सी च्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल असेही सांगितले.
विजय भांगरे, मंगल गायकवाड, भिमराव वाढवे,अशोक ताटे, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
संभाजी थिटे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रकाश रणदिवे यांनी मानले.सामूहिक वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
वृत्तांकन: अंबादास रोडे ,मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल, माण
९५५२५९६२२९













