थकबाकीदारांसाठी अंतिम इशारा; ३१ मार्चपूर्वीच होणार ४९० जप्त मालमत्तांचा लिलाव !
एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम भरल्यास मालमत्ता सीलमुक्त होणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी सक्तीची कार्यवाही डिसेंबर २०२४ पासून सुरू सातत्याने सुरु आहे. यापूर्वी शहरातील बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र प्रकारातील १०५७ मालमत्तांवर जप्तीची कार्यवाही करणेत आली. १०५७ जप्त मालमत्ता धारकांपैकी ५६७ थकबाकीदारांनी त्यांचे मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्याने थकबाकीदारांची मालमत्ता सील काढण्यात येऊन संबंधित मालमत्ता मालमत्ताधारकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. तदनंतर दिनांक २० मार्च रोजी शहरातील सर्व वर्तमानपत्रामध्ये उर्वरीत ४९० बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांची लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेत आली. यापैकी १२ मालमत्ताधारकांनी ६३ लाखांचा भरणा केला असून २४ मालमत्ताधारकांनी ३८ लाखांचा अशंत: भरणा केला असून यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक रकमेचा भरणा करणारे ११ इतक्या मालमत्ता लिलावप्रक्रियेतून मुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ४९० मालमत्ताधारकापैकी ३६ मालमत्ताधारकांकडून एकूण १ कोटींहून अधिक कर भरण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ४६७ मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा दिनांक ३१ मार्च रोजी लिलाव करण्यात येणार असून सदर मालमत्ताधारकापैकी २ लाखाहून अधिक रक्कम असलेल्या मालमत्ताधारकांनी एकूण रकमेच्या ५० टक्के रकमेच्या कराचा भरणा केल्यास सदर मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून काढण्यात येऊन मालमत्ता सीलमुक्त करण्यात येणार आहे. असे जाहीर करण्यात आले आहे.
सदर मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या मालमत्तांसाठी खरेदीदार उपलब्ध होणार नाही अशा मालमत्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत एक रुपयाची नाममात्र बोली बोलून खरेदी करण्यात येणार आहे. असे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे
महानगरपालिकेकडून ३१ मार्चपूर्वी लिलाव व वसुली प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट !
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने एकूण १०५७ बिगरनिवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि मिश्र मालमत्ता जप्त केल्या. त्यामध्ये साधारणत: २६ कोटी रकमेचा मालमत्ता कर प्रलंबित होता, त्यापैकी ५६७ खातेदारांनी ११ कोटी रक्कम भरलेमुळे त्यांच्या मालमत्ता मूळ मालकाच्या ताब्यात देणे आल्या आहेत. अद्यापही ४९० थकबाकीदारांकडून जवळपास १५ कोटी रक्कम येणे असून, त्यांचा लवकरच ३१ मार्च २०२५ पूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. तसेच सध्या ६९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असण्याऱ्या बिगरनिवासी,औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, जप्त केलेल्या मालमत्तांचा ३१ मार्च पूर्वीच लिलाव केला जाणार आहे.
मालमत्ता धारकांनी त्वरित मालमत्ता कराचा भरणा करून कारवाई टाळावी !
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने एकूण ५६७ खातेदारांकडून जवळपास ११ कोटी रुपये जप्ती कार्यवाहीचे मार्गाने वसूल केली आहे. अद्यापही ४९० खातेदारांकडून जवळपास १५ कोटी इतकी रक्कम वसूली प्रलंबित आहे. महानगरपालिकेने ‘थकबाकीमुक्त महानगरपालिका’ असा निश्चय केला असून त्या दृष्टिकोनातून थकबाकीदार मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेचा कर ३१ मार्च पूर्वी जमा करावा.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
“पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने माहे डिसेंबर पासून बिगरनिवासी / औद्योगिक / मिश्र मिळकतीवर जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, आणि हीच कार्यवाही थकबाकी संपूर्ण कर वसूल होईपर्यंत सुरू राहणार आहेत. तथापि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता रहिवाशी थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला असून महानगरपालिका प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. आपल्या दरवाज्यात महानगरपालिकेचे कर्मचारी येणेपूर्वी आपला १०० टक्के मालमत्ता कर ३१ मार्च पूर्वी जमा करावा.”
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका









