ताज्या घडामोडीपिंपरी

थकबाकीदारांची धाबे दणाणले, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध होणार!

Spread the love

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आर्थिक वर्ष संपण्यास 38 दिवस बाकी असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातर्फे थकीत कर वसुलीसाठी अतिशय धडाकेबाज निर्णय घेण्यात येऊ लागले आहेत. 1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.  मालमत्ता जप्ती संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले जाणार असून रिक्षाव्दारे थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचा मोठा निर्णय कर संकलन विभागाने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरित थकीत आणि चालू कर भरून आपली कुप्रसिद्ध टाळावी. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 24 मालमत्तांचे मुल्यांकन ठरवून लिलाव समितीसमोर नुकताच प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यावर आठवड्याभरात मान्यतेचा निर्णय होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. आतापर्यंत तब्बल 773 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची टीम झपाटून कामाला लागली आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 38 दिवस बाकी आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे.

             कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळ कनेक्‍शन बंद करणे या सारख्या कठोर कारवाया सुरू असतानाच आता प्रत्येक झोनमधील बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करताना काढण्यात येणारे व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

          त्याचबरोबर सद्य स्थितीत चालू कर आणि थकीत कर भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये रिक्षावर स्पीकर लावून जनजागृती केली जात आहे. मात्र, जनजागृती करूनही आणि विशेष म्हणजे कर भरण्याची क्षमता असूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे स्पीकरव्दारे जाहीर केली जाणार आहेत.

5  गव्हर्मेंट व्हॅल्यूयर पॅनलवर

कर संकलन विभागाच्या वतीने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका लावला आहे. आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. आता या जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी गव्हर्मेंट व्हॅल्यूयरची आवश्यकता होती. याबाबत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार विहित मुदतीत 5 गव्हर्मेंट व्हॅल्यूयरचे अर्ज महापालिकेकडे आले होते. या पाचही जणांची पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे.

‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ ची रिल्स स्पर्धा घेणार

पिंपरी चिंचवड शहरात 76 जण

5 हजार पेक्षा जास्त फाॅलोअर्स संख्या असणारे ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी या ‘इन्फ्लुएन्सर’चा उपयोग करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. या 76 जणांमध्ये कर भरण्या संदर्भात नागरिकांना प्रेरित करण्यासाठी रिल्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. जे ‘इन्फ्लुएन्सर’ हटके आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ तयार करेल त्यांना कर संकलन विभागाच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.

आजवर केलेल्या कारवाईचा तपशील

जप्त केलेल्या मालमत्ता:- 844

सिल केलेल्या मालमत्ता:- 451

नळजोड खंडित केलेल्या मालमत्ता:- 151

वरील मालमत्तांकडे थकीत कर:- 18.5 कोटी रु.

24 मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी लिलाव समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर एका आठवड्यात निर्णय घेतला जाईल. तसेच जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन ठरविण्यासाठी 5 गव्हर्मेंट व्हॅल्यूयरची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता लिलाव प्रक्रियेला वेग येणार आहे. आतापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त मालमत्तांची जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी कर भरून जप्ती आणि लिलावासारखी कटू कारवाई टाळावी.

– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

या आर्थिक वर्षात पालिकेने शंभर टक्के बिलांचे वाटप मे महिन्यात केलेले आहे. त्यानंतर 50 हजारवरील थकीत रकमा असणाऱ्या मालमत्ता धारकांना सहा महिन्यापूर्वीच जप्ती पूर्व नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर टेलीकॉलिंगच्या माध्यमातून वारंवार फोन केले जात आहेत. अनेक वेळा एसएमएस पाठवून बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे. पण त्यानंतरही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्यामुळे जप्ती, सिल करणे, नळ कनेक्शन कट करणे अशा अप्रिय कारवाया करणे भाग पडत आहे.

:- नीलेश देशमुख

सहायक आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button