डॉ. नबानिता चौधरी यांचे शास्त्रीय गायन, उदय भवाळकर यांचे धृपद गायन, तर जगप्रसिद्ध बासरीवादक डॉ. राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरीच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी डॉ. नबानिता चौधरी यांचे शास्त्रीय गायन , उदय भवाळकर यांचे धृपद गायन, तर जगप्रसिद्ध बासरीवादक डॉ. राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरीच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे सुरू असलेल्या या महोत्सवात संगीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध गायिका डॉ. नबानिता चौधरी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंती व तराना गायला. त्यानंतर त्यांनी ऐसा ही गुरु भावे साधो’ गात रसिकांची दाद मिळवली. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार यांनी, तर हार्मोनियमवर गंगाधर शिंदे यांनी साथसंगत केली.
जगप्रसिद्ध बासरीवादक डॉ. राजेंद्र प्रसन्ना यांनी आपल्या बासरीवादनाला राग मारवा’ने सुरुवात केली. पहाडीमधली धून रसिकांना भुरळ घालत गेली. बासरीच्या सुरात रसिक तल्लीन झाले होते. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर यशवंत वैष्णव यांची साथसंगत मिळाली.
त्यानंतर धृपद गायक पं. उदय भवाळकर यांनी राग बिहागने आपल्या गायनाची सुरुवात केली. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धृपद गायनाने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. त्यांना पखवाजावर प्रताप आव्हाड यांची साथसंगत मिळाली.












