ताज्या घडामोडीपिंपरी

झिका आजाराबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सतर्कता महापालिकेचे आवाहन, घरातील पाण्याची भांडी, साठवणी स्वच्छ ठेवावीत

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरामध्ये झिका आजाराचा रुग्ण आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शहरातील पालिकेच्या सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.

वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्‍या माहितीनुसार झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू हा Flavivirus प्रजातीचा असून तो एडिस डासामार्फत पसरतो, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आली आहे. झिका आजाराची लक्षणे डेंग्यू आजारासारखी असतात. ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायु दुखणे, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे.

गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणा-या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो, व बाळाच्या मेंदूची वाढ कमी होते, असे दिसून येत आहे.

झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे. Mosquito Repellent चा वापर करावा. घरातील पाण्याची भांडी, टाक्‍या व्यवस्थित झाकाव्यात. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळया बसवाव्यात. डास चावणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.आठवडयातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करावीत. घराच्या

परिसरातील अडगळ दूर करुन परिसर स्वच्छ ठेवा. तापात डाॅक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याविना औषधे घेऊ नयेत. कोणताही ताप अंगावर काढू नये. झिका विषाणूग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंधातून हा आजार पसरु शकतो, त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महत्त्वाच्‍या बाबी
– झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही.
– रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.
– पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणुच्या उपचाराकरीता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.
– काही लक्षणे आढळल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखाना येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button