जैन श्रावक संघातर्फे कासारवाडीत आनंद सप्ताह

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रसंत आचार्यसम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कासारवाडीतील जैन श्रावक संघाच्या वतीने आनंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून झाला. या दिवशी जैन स्थानकाच्या आनंद दरबारमध्ये उपप्रवर्तिनी मंगल प्रभाजी, डॉ मधुस्मिताजी, हर्षिताजी आणि दिव्यांशीजी यांनी प्रवचनाच्या आणि सुंदर भक्ती गीताच्या माध्यमातून सामायिकचे महत्त्व विशद केले. मंगल प्रभाजी यांनी आगम मधील ‘सुखविपाक सूत्रांचे’ स्पष्टीकरण सांगितले.
बुधवारी (ता. ३१) दान दिवस झाला. या दिवशी सर्व भाविकांनी इच्छेनुसार दान केले. कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या ठिकाणचे श्रावक श्राविका प्रवचनास मोठ्या संख्येने हजर होते. ‘सोमवारपर्यंत (ता.५) सुरू असणाऱ्या या सप्ताहामध्ये आनंद गुरवे नमः जाप, तसेच सामूहिक एकासना, आयंबिल दिवस, मौन दिवस, सामूहिक साधना आणि गुरू आनंद गुणानुवाद असे वेगवेगळे धार्मिक अनुष्ठान व कार्यक्रम होणार आहेत,’ अशी माहिती कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी दिली.












