ताज्या घडामोडीपिंपरी

जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून रयतेमध्ये विश्वास निर्माण केला – हपभ शिरीष महाराज मोरे 

Spread the love
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचे चौथे पुष्प
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  छत्रपती शिवाजी महाराज नऊ वर्षांचे असताना त्यांच्या हस्ते जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून रयतेमध्ये पुणे वसवण्यासाठी विश्वास निर्माण केला. ही घटना म्हणजे मोगलांच्या राजवटीतून रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रचलेला पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराष्ट्र निर्मितीचा ध्यास घेतलेले, प्रखर राष्ट्रवाद जोपासणारे,  सृजनशील व्यक्तिमत्व होते असे हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले.
    चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना मोरे बोलत होते. जिजाऊ व्याख्यानमालेचे हे ३४ वे वर्ष आहे. यावेळी उद्योजक एस. बी. पाटील, श्रीकृष्ण कुलकर्णी, माजी नगरसेवक वसंत शेवडे, तसेच राम साखरे, राजू शिवतरे, संजय कलाटे, संतोष माचूत्रे, नवनाथ तरडे, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम आदी उपस्थित होते.
मोरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाला पूर्वी मुघलांचे आक्रमण सुरू होते. यावेळी समाज व समाजाचे नेतृत्व असुरक्षित होते. मंदिरांवर आक्रमणे होत होती. पंढरपूर, काशी, सोरटी सोमनाथ येथील मंदिरांवर आक्रमण करून मूर्तीची विटंबना केली जात होती. आया, बहिणींना पळवून नेऊन गुलाम केले जात होते. निरपराध नागरिकांची हत्या केली जात होती. ही लूट व अन्याय ५०० वर्ष सुरू होते. हे सर्व धर्मांतरासाठी केले जात होते. राजमाता जिजाऊंनी अत्याचार, अन्याय आणि अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माची राजवट उभारण्याचे स्वप्न पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्म तसेच रयतेच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी प्रथमच अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली.
शेतकऱ्यांना व रयतेला सोबत घेऊन कृषी क्रांती, सैनिक क्रांती, आर्थिक क्रांती, धर्म आणि सांस्कृतिक क्रांती करीत शेतकरी व रयतेच्या हिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. स्वराज्यात शेतकऱ्यांना बी बियाणे, यंत्र, अवजारे मोफत दिली जात होती. शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज, शेतसारा मध्ये मध्ये सवलत देऊन दोन वेळचे भोजन देखील मोफत दिले जायचे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. शेती उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन दिले. कास्तकरी, बलुतेदारांना, अलुतेदारांना कृषीक्रांती नंतर अर्थक्रांतीसाठी मदत करून प्रोत्साहन दिले. कृषीक्रांती बरोबर सैन्य क्रांती ही केली. नंतर अर्थक्रांती केली. रयतेच्या मनामध्ये प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. स्वभाषेचा त्यांनी पुरस्कार केला. राजमुद्रेवर, चलनी नाण्यांवर सर्वात प्रथम देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषेचा वापर केला. रघुनाथ पंतांना सांगून संस्कृत भाषेतील पहिला शब्दकोश तयार केला असेही हभप शिरीष महाराज मोरे यांनी सांगितले.स्वागत महेश गावडे आणि आभार सुहास पोफळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button