चिखली -डांगे चौक बस शिवरकर मार्गे सुरु करा : रावसाहेब थोरात

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली- डांगे चौक या मार्गावरील ध पीएमपीएल बसेस साने चौक, म्हेत्रे गार्डन, शिवरकर चौक, कृष्णानगर मार्गे सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात यांनी केली आहे.
या संदर्भात थोरात यांनी पी एम पी एल चे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पूर्वी कृष्णा नगर ते पुणे स्टेशन (३१८ ) ही बस शिवरकर चौक, म्हेत्रे चौक, कृष्णनगर येथून आँध मार्गे पुणे स्टेशनला जात होती. काही करणास्तव ती बस बंद झाल्याने कृष्णनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, मोरे वस्ती या भागातील नागरिकांची विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच पुणे, औंध, ताथवडे या ठिकाणी कॉलेजला जाणा-या तरुण-तरुणींना साने चौक किवा धरमॅक्स चौक तसेच निगडी येथे पायी जाऊन बस पकडावी लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, महिला भगिनींना ना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे चिखली -साने चौक बस स्पाईन रोडने शिवरकर चौक, म्हेत्रे चौक, साने चौक मार्गे सुरू करावी. त्यामुळे २० ते २५,००० नागरिकांना बसची सोय उपलब्ध होईल. या भागात बसला वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच शिवरकर चौक, म्हेत्रे चौक येथे यापूर्वीच बस स्टॉप बांधून ठेवलेले आहेत. लवकरात लवकर वरील मार्गे बस चालू करावी व त्याबाबतचे फलक बस स्टॉप वर लावावेत, अशी मागणी थोरात यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान, या मागणीबाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे थोरात यांनी सांगितले.













