गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाश्वत विकासाचा संकल्प : आमदार महेश लांडगे
निवासस्थानी तसेच जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारत शहरवासीयांना दिल्या शुभेच्छा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी निवासस्थानी तसेच जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारत पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प सोडला. आगामी काळात हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगत शहर विकासासाठी भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच सकाळी निवासस्थानी तसेच भोसरी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारत त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा देखील स्वीकारल्या. कुटुंबीय, सहकारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहर विकासाच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला.
आगामी काळात शहराच्या दृष्टीने पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, पाण्याचे नवे स्त्रोत शहरासाठी उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करणे. संविधान भवन, न्यायालय इमारत, मोशी हॉस्पिटल, भोसरी विधानसभा मतदारसंघातील उपनगरातून शहराला जोडणारे नवे रस्ते तयार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्याचा संकल्प हिंदू नववर्षाच्या निमित्ताने केला असल्याचे देखील आमदार लांडगे यांनी सांगितले.
धर्म रक्षणाची साद घालणारा, मराठी अस्मिता सांगणारा, नवचैतन्याची उभारी देणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहर विकासाचा संकल्प केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मोठे “पोटेन्शिअल” आहे. या शहराचा विकासाचा वेग लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन आणि अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा संकल्प केला आहे.
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड













