ताज्या घडामोडीपिंपरी

गीता कधीही कालबाह्य होत नाही! – अजेयबुवा रामदासी

Spread the love
चिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “गीता कधीही कालबाह्य होत नाही!” असे प्रतिपादन सज्जनगड येथील अजेयबुवा रामदासी यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले.
गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त चिन्मय मिशन, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अजेयबुवा रामदासी बोलत होते. चिन्मय मिशन, पुणेच्या आचार्य ब्रह्मचारिणी मैत्रेयी चैतन्य, पिंपरी – चिंचवड विभागाचे अध्यक्ष हेमंत गवंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. हेमंत जोशी यांनी प्रास्ताविकातून, “चिन्मय मिशन, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत एकूण ६० शाळांमधील बालवर्ग ते बारावी या स्तरावरील सहा गटात  सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे ३६ वर्षांपासून सातत्याने शालेय स्तरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी शाळांचा उत्साह अन् सहभाग प्रचंड प्रमाणावर आहे. स्पर्धेसाठी गीतेमधील पाचव्या अध्यायाची निवड करण्यात आली होती!” अशी माहिती दिली. हेमंत गवंडे यांनी, “पालकांनी आपल्या मुलांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले ही स्तुत्य बाब आहे. जगभरातील चिन्मय मिशनच्या एकूण ३५० शाखांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन केले जाते; तसेच विविध भाषांमधून गीता आणि आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या ग्रंथांविषयी माहिती दिली जाते!” असे सांगितले. मैत्रेय चैतन्य यांनी मनोगतातून, “गीतेचे पठण करताना गीता काय आहे याविषयी जिज्ञासा निर्माण होते. हे एकमेव ज्ञान असे आहे की त्यातून कृतार्थता लाभते!” असे मत व्यक्त केले. अजेयबुवा रामदासी पुढे म्हणाले की, “भारतीय आणि हिंदू हीच आपली पहिली ओळख आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी आपली संस्कृती आहे. त्यामुळे बालपणापासून गीता शिकवली तर अंत:करणात राष्ट्रभक्ती रुजेल अन् तारुण्यात परदेशात स्थायिक होण्याचे आकर्षण निर्माण होणार नाही!”
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यापैकी प्रथम क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे :-
अ गट :-
धैर्यशील पाटील, अहिल्या भालेराव, अन्वित रानडे, वल्लरी पाटील, रमा कुलकर्णी, जानकी मिश्रा
ब गट :-
उर्वी शाळिग्राम, राघव इनामदार, इंद्रनील चिटणीस, श्रीवेद केसरकर, राधा पावसकर, शौर्य पाटील
क गट :-
गार्गी काठीकर, शतानंद गणोरकर, आरुष, दीप्ती आफळे, अर्चित सावंगीकर, आद्या गोडसे
ड गट :-
स्वरा भोसले, अनिष दातार, स्वराज राक्षे, अनुप कुंभार
ई गट :-
किरण गायकवाड, नंदिनी पिंपरकर, स्वरदा शिरुडे, अभीर जोशी, चार्वी नयना
फ गट :-
मिहीर काळे
विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, अमृता विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल या शाळांना तसेच परीक्षकांना सन्मानित करण्यात आले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button