गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन

गहुंजे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील वामनभाऊ हाउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज, शनिवारी (१२ एप्रिल) हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व थाटामाटात साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगी मावळचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गहुंजे येथील हे हनुमान मंदिर स्थानिकांसह आसपासच्या गावांमध्ये “नवसाला पावणारा हनुमान” म्हणून विशेष श्रद्धेचे स्थान मिळवून आहे. एका भाविकाने सांगितलेल्या अनुभवानुसार, त्याला काही महत्त्वाच्या कामांमध्ये सतत अडथळे व विलंब होत होते. त्याने या मंदिरात नवस केला आणि अवघ्या एका महिन्यात त्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या. हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत सुखद व समाधानकारक ठरला. त्यामुळे हे मंदिर भाविकांमध्ये आणखी श्रद्धास्थान बनले आहे.
या मंदिराचे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे वामनभाऊ हाउसिंग सोसायटीतील कार्यकर्ते – दीपक शहाणे, राजेंद्र खाडे, रामेश्वर बडे, नवनाथ बडे, राजन बडे, लहू खंडारे, बाबासाहेब बडे व त्यांचे सहकारी – अत्यंत नियोजनबद्धपणे करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करताना महाप्रसादाची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे.
या पावन दिवशी नवस फेडण्यासाठी, दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गहुंजेतील हे श्रद्धास्थळ भाविकांमध्ये असलेली आस्था आणि त्यांच्या अनुभवांमुळे अधिकच प्रसिद्ध होत आहे.













