गणेशोत्सवापूर्वी पिंपरी चिंचवड शहर खड्डेमुक्त करा मनसेचे पिंपरी महापालिकेत आंदोलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गांत अडथळा ठरणारे खड्डे पुढील एक आठवड्यात बुजविण्यात यावेत. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेत घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहर खड्डे मुक्त झाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे अनेक महिन्यापासून पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु याची दखल न घेतली गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दापोडी येथील मेट्रो स्टेशनच्या खाली असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत आंदोलन करण्यात आले. तसेच यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनाच्या येथे घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मकरंद निकम यांची भेट घेतली. दरम्यान राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी रस्ते पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये असणाऱ्या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी त्या ठिकाणी बारीक खडी टाकण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी स्लिप होऊन वाहनांचे अपघात होत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत पद्धतीने व्हावे, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करणे गरजेचे आहे. गणेशाचे आगमन, विसर्जनादरम्यान कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची खात्री करावी.खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी. महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.
यावेळी आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, राजू सावळे, मयूर चिंचवडे, दत्त देवतरासे, विनोद भंडारी, रुपेश पटेकर, तुकाराम शिंदे, नितीन चव्हाण, निलेश कांबळे, नारायण पठारे, प्रतीक वाळुंज, तुषार सोनटक्के, प्रेम पवार, मानतू राठोड, अक्षय देसले, करण गायकवाड, नितीन चव्हाण, रोहित थोरात, के के कांबळे, केदार चव्हाण, अलेक्स अप्पा मोझेस, अंकित शिंदे , जय सकट , बंटी कांबळे यांनी सहभाग घेतला होता.













