गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत पिंपरीत लाडक्या गणरायाला निरोप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देतांनाच पुढल्या वर्षी लवकर या असा नारा गणेश भक्तांनी दिला.
पिंपरी येथील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.
चिंचवड येथील चापेकर चौकात देखील महापालिकेव्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित आदी उपस्थित होते.
महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी ८५ घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४० फूट बाय ३० फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ मोठ्या विघटन केंद्रांची स्थापना केली . या विघटन केंद्रांवर प्रथमच गणेशमूर्तीचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन केले.. या केंद्रांच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली होती.शहर परिसरातून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. विसर्जन घाटांसह ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पिंपरीत प्रथम फाईव्ह स्टार तरुण मंडळाचे विसर्जन झाले. त्यानंतर मोरया मित्र मंडळ गांधीनगर पिंपरी, सदानंद तरुण मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, हर्षल मित्र मंडळ पिंपरी कॅम्प, शिव शंभो मित्र मंडळ पिंपरी, श्री नव चैतन्य तरुण मंडळ पिंपरी, संग्राम मित्र मंडळ पिंपरी, शिव शक्ती तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ, कैलास मित्र मंडळ कैलास नगर पिंपरी, इंडीयन बॉय मित्र मंडळ, नव चैतन्य तरुण मित्र मंडळ, कोहिनूर मित्र मंडळ या मंडळांच्या गणपतीचे आतापर्यंत विसर्जन झाले.













