कोणतीही माहिती शपथपत्रातून दडवली नाही आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून आरोपांचे खंडन

निवडणूक विभागाने सुलक्षणा धर यांचा हरकत अर्ज फेटाळला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आपण कोणतीही माहिती शपथपत्रातून दडवली नाही. ज्या कागदपत्रांचा वापर करून निवडणूक विभागाकडे हरकत नोंदवली जात आहे, ती फार पूर्वीची असून संबंधित संस्थेवरून आपण यापूर्वीच राजीनामा दिला असल्याचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांनी निवडणूक विभागाकडे नोंदविलेल्या हरकतीचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी खंडन केले. धर यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेली माहिती खूप जुनी असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
अण्णा बनसोडे म्हणाले, “चिखली येथील सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदाचा मी मागील काही वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्या संस्थेच्या कार्यकारणीवर कोण आहेत याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्या संस्थेवर मी अध्यक्ष असल्याबाबत विरोधकांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेली कागदपत्रे जुनी आहेत. निवडणूक विभागाने याबाबत चौकशी करून विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विरोधासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने विरोधकांकडून असे तथ्यहीन प्रकार केले जात आहेत. अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. त्यांच्याच विचारांवर मी काम करत आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असेही आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले.
निवडणूक विभागाने तोंडावर पाडले
सुलक्षणाला शीलवंत धर यांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक विभागाने चौकशी केली. त्या चौकशीमध्ये अण्णा बनसोडे यांनी कोणतीही माहिती दडवली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान निवडणूक विभागाने धर यांनी सादर केलेला हरकत अर्ज फेटाळून लावला आहे.













