Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती, जाधववाडी या परिसरात महानगरपालिकेने कलम ५३ अन्वये केलेल्या निष्कासन कारवाईमध्ये लघुउद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पालिकेने केलेल्या कारवाईनंतर राडारोडा तसाच आहे. काही लघुउद्योजकांच्या मशीन अस्ताव्यस्त जागेवर पडलेल्या आहेत. उद्योजकांना इतर ठिकाणी भाड्याने जागा मिळालेल्या नाहीत. उद्योजक सध्याच्या परिस्थितीत जागा विकत घेऊ शकत नाहीत. कारवाईच्या खर्चाचा बोजा जागा मालकाच्या सातबाऱ्यावर टाकून तो उद्योजकाकडून वसूल केला जाणार आहे.

याबाबत तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शुक्रवारी (दि. २१) रोजी भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ आदी उपस्थित होते.

याबाबत महापालिका आयुक्तांनी राडारोडा व मशीन उचलण्यासाठी मुदत वाढवून देऊ. बांधकाम पाडण्याच्या खर्चाचा बोजा सातबाऱ्यावर चढविण्याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल. ज्यांच्या जागा आहेत त्यांना त्याच जागेवर औद्योगिक बांधकाम करता येईल. त्यासाठी पालिकेच्या नियमानुसार रितसर परवानगी घ्यावी. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमनानुसार ती देण्यात येईल. त्यासाठी पुढील दोन ते तीन दिवसात बैठक घेऊ, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. .

Share.
Leave A Reply

Exit mobile version