ताज्या घडामोडीपिंपरी

कवीची लिपी कोणतीही असली तरी ती काळजाला भिडते!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love
पिंपरी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “कवीची लिपी कोणतीही असली तरी ती काळजाला भिडते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल आयोजित ३१व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवात गिरीश प्रभुणे बोलत होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थानी होते; ह. भ. प. नारायणमहाराज जाधव,
तसेच सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे आणि स्वागतप्रमुख एस. बी. पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कवितामहोत्सवात नांदेड येथील प्रा. डॉ. जगदीश कदम यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. जालना येथील ज्येष्ठ कवयित्री संजीवनी तडेगावकर (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), कुर्डुवाडी येथील पारंपरिक लोककलावंत वर्षा मुसळे (गदिमा लोककला पुरस्कार), ज्येष्ठ कवयित्री आश्लेषा महाजन (गदिमा शब्दप्रतिभा पुरस्कार), ज्येष्ठ कवी इंजि. शिवाजी चाळक (कविराज उद्घव कानडे स्मरणार्थ केशरमाती काव्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कारासाठी शिरूर येथील दत्तात्रय जगताप (‘तू फक्त बाई नाहीस!’), नांदगाव येथील प्रतिभा खैरनार (‘पडसावल्या’), बीड येथील प्रभाकर साळेगावकर (‘प्रसन्न प्रहार’), औरंगाबाद येथील संतोष आळंजकर (‘हंबरवाटा’), धाराशिव येथील प्रा. अलका सपकाळ (‘वादळ झेलताना’), पुसद येथील आबिद शेख (‘चोचीमधील दाणे’) या कवींच्या कवितासंग्रहांना पुरस्कृत करण्यात आले; तसेच मृत्युंजय साहित्य पुरस्कारासाठी परभणी येथील बा. बा. कोटंबे यांच्या ‘तिटा’ या कादंबरीची निवड करण्यात आली होती. गदिमा दिवाळी अंक पारितोषिकासाठी ‘दुर्गांच्या देशात’ (प्रथम), ‘अधोरेखित’ (द्वितीय) आणि ‘शब्दाई’ (तृतीय) या अंकांची निवड करण्यात आली होती. गदिमा काव्यस्पर्धेत पांडुरंग बाणखेले (प्रथम), अनिल नाटेकर (द्वितीय), जयश्री श्रीखंडे (तृतीय) आणि वसंत घाग (उत्तेजनार्थ) या कवींनी पारितोषिक पटकावले. पुरस्कार वितरणाआधी झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात लता ऐवळे, प्रशांत केंदळे, सुहास घुमरे, श्रीनिवास मस्के, देवदत्त साने या निमंत्रित कवींसह पुरस्कार विजेत्या कवींनी विविध आशयविषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. भरत दौंडकर यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “गौतम बुद्ध, जाबाली, ज्ञानोबा, तुकोबा ही साहित्यातील विद्रोही काव्यपरंपरा प्राचीन आहे. सुमारे चाळीस हजार वर्षांपासून भारतात साहित्य आणि कला यांचे सर्जन होते आहे. असंख्य जातीजमातींमधून संतकवी निर्माण झाले; तसेच आपल्या संस्कृतीतील देवदेवता या श्रमिकांचे प्रतीक आहेत. वेदना अन् दु:खातून निर्माण होणारा परिहास जीवनाचे सार सांगतो!” नारायणमहाराज जाधव यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. प्रा. फ. मुं. शिंदे यांनी, “आत्मभक्तीशिवाय अभिव्यक्ती शक्य नसते. प्रतिभावंत हा दु:खाचा शोध घेत असतो!” असे मत व्यक्त करून, “एकटेपणाची कधीकधी भीती वाटते…” ही कविता सादर केली. प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी सत्काराला उत्तर देताना, “व्यास, वाल्मीकी ते गदिमा ही कवींची मांदियाळी खूप मोठी आहे. कविता ही साधी गोष्ट नाही. दोन ओळींमध्ये कविता आपला छोटा जीव घेऊन प्रकट होत असते!” अशी भावना व्यक्त केली. रविराज इळवे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “आपण सारे ज्ञानोबा, तुकोबा अन् गदिमांचे अंश आहोत!” असे विचार मांडले.
वृक्षपूजन आणि राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या गदिमा लिखित “एक धागा सुखाचा…” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून, “गणपती पाहण्याऐवजी मी गजानन दिगंबर माडगूळकर यांना पाहण्यासाठी पहिल्यांदा पुण्यात आलो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कामगार साहित्य क्षेत्रात काम करायला सुरुवात केली!” अशी माहिती दिली. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. वर्षा मुसळे यांनी लावणीनृत्य केले. शिवन्या संत या चिमुरडीने गीतरामायणातील गीत सादर केले. सुरेश कंक, बाजीराव सातपुते,‌ मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, प्रभाकर वाघोले, अरुण गराडे, मुकुंद आवटे, अरुण इंगळे, सुप्रिया सोळांकुरे, जयवंत भोसले, इंद्रजित पाटोळे, संगीता झिंजुरके, वर्षा बालगोपाल, एकनाथ उगले, सायली संत यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर साठे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button