ताज्या घडामोडीपिंपरी

कलाश्री संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन, सारंगीने घेतला रसिकांच्या काळजाचा ठाव 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत, २६ व्या कलाश्री संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शास्त्रीय गायिका मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद साबिर खान यांचे सारंगी वादन व पं. सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
संगीत महोत्सवाचे उदघाट्न पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कलाश्री संगीत विद्यालयाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, पं. रामराव नाइक, समीर महाजन, सचिदानंद कुलकर्णी, गणेश ढोरे, सुधीर दभडकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात सुरवातीला कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबला वादन, गायन झाले. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत या चिमुकल्यांचे कौतुक केले.
त्यानंतर कलाश्री संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरवात गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग ‘पूर्वी’ सादर केला, तसेच नारायणा रमा रमणा हे नाट्यपद गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव यांनी तर हार्मोनियमवर हर्षल कटदारे यांनी संगीतसाथ केली.
राजस्थानमधील सिकर घराण्याची परंपरा पुढे नेणाऱ्या उस्ताद साबिर खान यांचे सारंगीवादन रसिकांना वेगळीच कलानुभूती देऊन गेली. त्यांनी राग चंद्रकौंस वाजवला आणि लोरी सादर केली. काही परदेशी रसिकही खास सारंगीवादन अनुभवण्यासाठी आले होते. उस्ताद साबिर खान यांना तबल्यावर समीर सूर्यवंशी यांनी साथ दिली.
महोत्सवातील पहिल्या दिवसाचा समारोप पं. सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. त्यांनी राग रागेश्री, राग बागेश्री (तराना) तसेच काया ही पंढरी हे भजन गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील यांनी, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे यांनी, तर पखवाजावर गंभीर महाराज यांनी साथसंगत केली.
सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi