कडवट शिवसैनिक हा जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांसारखा असावा – सुलभा उबाळे

शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करावे – संतोष सौंदणकर
नेहरूनगर शाखेच्या वतीने नाम फलकासह जेष्ठ शिवसैनिक आणि कोविड योद्ध्यांचा सत्कार
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना अतिशय खडतर आणि दहशतीच्या वातावरणात झाली होती. विरोधक थेट गावगुंडांच्या माध्यमातून शिवसैनिकांवर हल्ले करायचे. तरीही, हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिदुत्वाचा त्याग या शिवसैनिकांनी त्यावेळी केला नाही. त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या बळावर आज शहरात शिवसेनेने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. कडवट शिवसैनिक हा जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांसारखा असावा. मिंधे गटातील गद्दारांनी सुरुवातीला शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना संपणार असल्याची आवई उठविली. परंतु, लोकसभेच्या पराभवाने विरोधकांचे दात घशात घालण्याचा पराक्रम उद्धव सेनेने केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे, असा निर्धार आपण यावेळी करू या, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केले.
‘भगवा सप्ताह शिव संकल्प’ अभियानांतर्गत शिवसेना (उद्धव ठाकरे) भोसरी विधानसभेच्या नेहरूनगर शाखेच्या वतीने शाखेच्या नाम फलकाचे नूतनीकरण, नेहरूनगरमधील ज्येष्ठ शिवसैनिक, कोविड योद्धा डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुलभाताई उबाळे बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव, चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण, शाखाप्रमुख प्रकाश जाधव, राजेश जाधव, शिवाजी शेळके, गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक समीर चव्हाण, बापू घुले, मनोहर कदम, विलास जाधव, मीरा तरासगार, संजय भालवणकर, प्रदीप बेळगावकर, संतोष करमारे, शरद उघडे आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉ. प्रफुल गरड यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, शिवसैनिकांनी प्रभाग स्तरावर शाखा मजबूतीकरणासाठी प्रयत्नशील रहावे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक शासकीय योजना जनसामान्यांसाठी राबविल्या आहेत. त्याची जनजागृती नव्याने करावी. मतदार नोंदणीसाठी आग्रही असावे. शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करावे. जेणेकरून आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल आणि आपलं संख्याबळ वाढेल.
चिन्मय जाधव, सिद्धार्थ धाकल, निखिल शिंदे, सौरभ प्रजापती, सौरव शिलवंत, विश्वजीत गायकवाड, भारत वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव यांनी शिवसेनेच्या बांधणीपासून शिवसेनेच्या समाजकार्याची विस्तृतपणे माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बेळगावकर यांनी तर, आभार शाखाप्रमुख प्रकाश जाधव यांनी मानले.









