उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महाकालेश्वर दर्शन; भक्तिभावाने घेतला भस्मारतीचा पवित्र अनुभव

जनकल्याणासाठी केला विशेष संकल्प
उज्जैन,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या प्राचीन मंदिरात पहाटे तीन वाजता त्यांनी पवित्र भस्मारतीचा अनुभव घेतला आणि महादेवाची भक्तिभावाने विशेष पूजा केली.
या प्रसंगी श्री महाकालेश्वर मंदिर प्रबंध समितीच्या उपप्रशासक सुश्री सिम्मी यादव यांनी डॉ. गोऱ्हे यांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार केला.
यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी ‘महाकाल लोक’ कॉरिडॉरची विशेष पाहणी केली. त्यांनी कॉरिडॉरमधील भव्य शिल्पकला, मंदिर परिसरातील श्री हनुमानजी व श्री दत्तात्रेय यांच्या भव्य मूर्ती, तसेच विविध उपमंदिरांचे सौंदर्य आणि भक्तांसाठी पुरवलेल्या सुविधा यांचे कौतुक केले. तसेच अन्नदान, सेवा उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची त्यांनी प्रशंसा केली.
महाकालेश्वराच्या चरणी नतमस्तक होताना, जनकल्याण, शेतकरी कल्याण, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, महिलांचा सशक्त सहभाग आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी संकल्प केला.
त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना शुभेच्छा देताना, केंद्र व राज्यात एनडीए आणि महायुतीचे स्थिर सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
“श्री शिवशंकराच्या आशीर्वादाने समाजातील दुःख, हिंसा दूर व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिक समृद्ध व्हावे,” अशी भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महादेवाच्या साक्षीने व्यक्त केली.













