ताज्या घडामोडीपिंपरी

उद्योग सुविधा कक्षाविषयी महापालिका व उद्योजकांमध्ये समन्वय बैठक संपन्न

व्यवसाय सुलभतेसाठी 'उद्योग सारथी' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्योजकांकडून स्वागत

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षाअंतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून औद्योगिक अडचणींचे निराकरण, संवाद आणि सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्योग सुविधा कक्षाबद्दल माहिती देण्यासाठी उद्योजकांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसेच उद्योग व सुविधा कक्ष व CSR प्रमुख निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, अजिंक्य येळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी दीपक पवार, उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे आणि सीएसआर सल्लागार श्रुतिका मुंगी आणि शहरातील उद्योजक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी उद्योग-सारथी पोर्टलचे सादरीकरण केले. ते म्हणाले, राज्य शासनाच्या ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ अंतर्गत ‘गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, स्थानिक व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद वाढवणे, गुंतवणूकदारांना कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे ही या कक्षाची मुख्य उद्दिष्ट आहेत. तसेच ‘उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग सारथी’ पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम केली जात आहे. या पोर्टलवरून उद्योजकांना परवाने, मंजुरी आणि इतर शासकीय सुविधा एका क्लिकवर मिळतील. तसेच थेट संवादामुळे त्यांच्या समस्या जलदगतीने सोडवता येतील, असेही अतिरिक्त आयुक्त खोराटे यावेळी म्हणाले.

उद्योग सुविधा कक्षात नियमित संवाद बैठका आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत मासिक बैठकांद्वारे स्थानिक प्रश्नांवर चर्चा व उपाय, आयुक्तस्तरीय त्रैमासिक बैठकांद्वारे धोरणात्मक संवाद तसेच CSR उपक्रम, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास यांची माहिती देणारी सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी दिली.

उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे यांनी उद्योजकांनी ‘उद्योग सारथी’ पोर्टलवर अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी केले. तसेच पुढील काळात विविध उद्योग संघटनांसोबत सल्लामसलत बैठकांचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. यावेळी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत उद्योजकांच्या वतीने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button