ताज्या घडामोडीपिंपरी
“उज्ज्वल व्यक्तिमत्त्वासाठी योग्य शिक्षणाची नितांत गरज!” – ॲड. सुहास पडवळ

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “उज्ज्वल व्यक्तिमत्त्वासाठी योग्य शिक्षणाची नितांत गरज असते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासह संस्थेच्या अन्य शाळांमधून समाजातील वंचित घटकांचे पुनरुत्थान करण्याचे अभिमानास्पद कार्य केले जात आहे!” असे गौरवोद्गार पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १००% निकालाप्रीत्यर्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ॲड. सुहास पडवळ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला समन्वयक निवेदिता कछवा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव, वासंती तिकोने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ॲड. सतिश गोरडे यांनी १००% निकालाबद्दल अभिनंदन करून विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक नगरकर, अशोक जाधव, बारावीच्या वर्गशिक्षिका शुभांगी बडवे, वासंती तिकोने यांच्यासह विद्यार्थी कस्तुरी काटवटे, अनुष्का चव्हाण, वैष्णवी सुतार, अजय इंगळे, मानसी चव्हाण, साक्षी चक्रनारायण, सतीश पवार, त्रिशाली आढाव यांनी मनोगते व्यक्त केली. निवेदिता कछवा यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “शिक्षण आणि निरंतर वाचन हे राष्ट्रहितासाठी अतिशय महत्त्वाचे आहे!” असे मत मांडले.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वैशाली कयापक यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षिका श्वेता निंभोरे यांनी स्वागत केले. संयोजनात अतुल आडे, सहशिक्षक बिभीषण चांडे, सहशिक्षिका राजश्री पाटील, अंकुश कांबळे, दादा खेडकर, मयूर विश्वास यांच्यासह शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केले. दीपाली शिंदे यांनी संस्कृतमधून सूत्रसंचालन केले. सुलभा झेंडे यांनी आभार मानले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













