पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सुजाता हरेश नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार तिवारी यांनी ही नियुक्ती केली आहे.

संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अनिता वर्मा यांच्या हस्ते सुजाता नखाते यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कांचन मोटघरे यादेखील उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय संघटना मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण ही संघटना देशातील मानवी हक्कांचे रक्षण, प्रचार आणि अंमलबजावणीसाठी कार्य करते. समाजात मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन रोखणे व नागरिकांमध्ये अन्यायाविरोधात जागरूकता वाढविणे हे या संघटनेचे मूळ उद्धिष्ट आहे. त्याचबरोबर समाजातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीही ही संघटना कार्य करते. त्यामुळे समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यात मदत होते.
दरम्यान, संघटनेच्या युवक आघाडीच्या नवनियुक्त प्रदेश अध्यक्षा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या कार्यरत असतात. या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून महिलांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार तिवारी व राष्ट्रीय उपाध्यक्षा अनिता वर्मा यांनी त्यांच्यावर संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
















