चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

अवीट गीतांच्या नावीन्यपूर्ण आणि सुरेल मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कशिश आयोजित आणि हिंदोळा प्रस्तुत ‘तू अन् मी – एक सुरेल प्रवास’ या अनवट, अप्रचलित किंवा काहीशा विस्मरणात गेलेल्या परंतु अवीट गोडीच्या अभिजात नव्या-जुन्या तसेच मराठी-हिंदी गीते आणि गझलांच्या नावीन्यपूर्ण मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २६ मे २०२४ ची सायंकाळ कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या दांपत्याच्या सुरेल आवाजातील सादरीकरणाने रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. ज्येष्ठ गझल गायिका डॉ. शशिकला शिरगोपीकर, ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिबीकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रांतील मान्यवर संगीतप्रेमींनी या मैफलीचा श्रवणानंद घेतला.
“ओंजळीत स्वर तुझेच…” या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेने मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. “शब्दसुरांचा हा हिंदोळा…” या युगुलस्वरातील शीर्षकगीताने खऱ्या अर्थाने मैफलीला सूरतालाची लय गवसली. जुन्या पिढीतील कवी ना. घ. देशपांडे, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, इलाही जमादार ते नुकतेच दिवंगत झालेल्या दीपक करंदीकर या कवींच्या रचनांना यशवंत देव, श्रीनिवास खळे, गजाननराव वाटवे, मधू जोशी, स्वतः कुमार करंदीकर यांनी चढवलेला स्वरसाज, करंदीकर दांपत्याने आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून आनंद, दुःख, प्रेम, विरह अशा वैविध्यपूर्ण भावभावनांची सुरेल अनुभूती देऊन गेला. “तू सप्तसूर माझे…” , “तुझ्यासाठी कितीदा…” , “धुंद तू धुंद मी…” , “तू येता या फुलांना…” अशी भावगीते,
“कोण जाणे कोण जवळून गेले
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले” अथवा “सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा
भैरवी गाईन मी तू मारवा गाऊन जा”
अशा गझला तसेच “कधी कुठे न भेटणार…” किंवा “मोहुनिया तुज संगे नयन खेळले जुगार…” यासारख्या कवितांनी श्रोत्यांना मोहित केले.
मैफलीच्या उत्तरार्धात जुन्या चित्रपटांमधील गझला आणि अभिजात गीतांचे सादरीकरण करण्यात आले. “बात निकलेगी तो फिर दूर तक जायेगी…” अशा लोकप्रिय रचनांसोबतच प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून पाकिस्तानी चित्रपटातील गझलेची पेशकश रसिकांना विशेष भावली. मैफलीदरम्यान कुमार करंदीकर यांनी, “पूर्वसुरींनी केलेले महान सांगीतिक कार्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आम्ही आहोत!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप करताना ‘ये इष्क नहीं आसान’ ही भावना अधोरेखित करणारी शमीम जयपुरी यांची,
“दिल लगाने की किसीसे वो सजा पायी की बस…”
ही गझल रसिकांना स्मरणरंजनाचा आनंद देऊन गेली. अरुण गवई यांनी तबलासाथ केली; तर स्नेहल दामले यांनी आपल्या अर्थवाही काव्यात्मक निवेदनाने श्रोत्यांची विशेष दाद मिळवली. आवर्जून पुन्हा पुन्हा ऐकाविशी ही मैफल संपू नये, असे रसिकांना वाटत असताना मैफलीचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button