ताज्या घडामोडीपिंपरीभोसरीमहाराष्ट्र

अलंकापुरी इंद्रायणी काठी मानपत्र प्रदान सोहळा हरिनाम गजरात मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव सन्मानित

Spread the love

नागरी सत्कार, भव्य दिंडी मिरवणूक, रांगोळ्यांचे पायघड्या

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ह. भ. प. गुरुवर्य शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार तसेच ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त आळंदी ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कारात मानपत्र प्रदान सोहळा हरिनाम गजरात झाला. तत्पूर्वी आळंदीत भव्य दिंडी मिरवणूक लक्षवेधी झाली. यावेळी मार्गावर जल्लोषात स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांच्या पायघड्या वरून बगीतून महाराजांची लक्षवेधी मिरवणूक झाली.

या निमित्ताने आळंदीत गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव यांची भव्य दिंडी मिरवणूक समस्त आळंदी ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय आळंदीच्या वतीने झाली. वारकरी संप्रदायातील हजारो साधक विद्यार्थी लहान मुले, मुली, महिला वारकरी, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, मृदुंग विणा, डोई वर तुळशी वृंदावन तसेच वारकरीसंप्रदायातील पोशाख, ज्ञानोबा तुकाराम नामजयघोष करत दिंडी मिरवणूक इंद्रायणी घाटावर सोहळ्यास पोहोचली. श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील मुलांनी श्री कृष्ण व वारकरी वेशातील विविध वेश भुषा परिधान करून मिरवणुकीत दाद मिळवली. इंद्रायणी नदी काठावर शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, ह भ प डॉ नारायण महाराज जाधव यांना आळंदी ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायातील बहुमूल्य कार्याबद्दल तसेच त्यांना ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थ अस्मिता पुरस्कार देऊन व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आळंदी ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांचे वतीने आळंदी ग्रामस्थ डी.डी. भोसले पाटील, राहुल चिताळकर पाटील, अर्जुन मेदनकर, अजित वडगावकर, निलेश महाराज लोंढे, संजय घुंडरे पाटील, सुनील रानवडे, राहुल चव्हाण, विलास काटे, सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, आदित्य घुंडरे पाटील आदींचे हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरहरी महाराज चौधरी, गोविंद महाराज गोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. दोन्ही मानपत्राचे शब्दांकन नरहरी महाराज चौधरी यांनी केले. यावेळी डी.डी.भोसले पाटील,उल्हास महाराज सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. मानपत्र प्रदान सोहळा व सत्कार सुरु असताना वेदश्री तपोवन संस्थेचे साधक मुलांनी वेदमंत्र जयघोष केला. यासाठी मोरे काका यांनी नियोजन केले.

मारुती महाराज कुरेकर म्हणाले, भव्य दिव्य सोहळा आळंदीकरांनी आयोजित करून त्यांनी आम्हाला आम्हाला आपलेसे केले. मधूकरी देऊन त्यांनी पालन पोषण केलेलेच आहे. आळंदी पंचक्रोशीतील शेजारच्या गावांचे सुध्दा आमच्यावर मोठे उपकार आहे. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी गुरुवर्य कुरेकर बाबांच्या कार्याचे कौतुक करीत आढावा घेत मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे प्रमुख विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप, विश्वस्त ऍड विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माउली वीर यांनी सत्कारमूर्तींचा माउली मंदिराचे वतीने सत्कार केला. विविध पदाधिकारी मान्यवरांनी सत्कार केले.भव्य दिंडी मिरवणूक मार्गावर सन्मान करीत औक्षण केले. नागरी सत्काराची सांगता सामूहिक पसायदान गायनाने हरिनाम गजरात झाली. आळंदीतील विविध वारकरी शिक्षण देणा-या संस्थांतील साधक या मानपत्र प्रदान सोहळ्यात सहभागी झाले होते. आळंदी ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांचे वतीने कार्यक्रमासाठी परिश्रम पूर्वक नियोजन करण्यात आले. सुत्रसंचलन आनंदराव मुंगसे यांनी केले. आभार प्रशांत कुऱ्हाडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button