अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना कर्मचाऱ्यांना द्याव्यात, अन्यथा मनसे स्टाईल भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काही ठिकाणी मराठी भाषेला जाणूनबुजून ठरवून नाकारण्याचे काम काही नाठाळ करताना आढळून येत आहेत. असे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाही, याची नोंद घेत अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाला द्याव्यात. अन्यथा मनसे स्टाईल भेट दिली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड शहरातील बँकांना देण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रमुख बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील आय.सी.आय.सी.आय. बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ इंडिया, (पिंपरी शाखा), डी.बी.एस.बँक (चिंचवड शाखा), आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक (पिंपरी शाखा), आर.बी.एल.बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ बडोदा (पिंपरी चिंचवड शाखा), एच डी.एफ.सी. बँक (पिंपरी शाखा) या बँकांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व कारखाने /अस्थापना /कार्यालये /बँका इत्यादी ठिकाणी होणारा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतूनच होणे अपेक्षित आहे. ग्राहकांशी /कर्मचारी वर्गाशी बोलताना मराठी भाषेचा वापर करणे, विविध अर्ज, निवेदने, विविध माहिती फलक आदींसाठी मराठी भाषेचा वापर होणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं प्रयत्न करीत आहे. याबाबत या अगोदरही आपल्याला निवेदने दिली आहेत. आता तर या संदर्भात राज्य सरकारने मराठी भाषेत व्यवहार करणे संदर्भात आदेशही दिले आहेत. तसे नियमही केले आहेत. इतकेच नाही तर मनसेच्या आग्रहानंतर मराठी भाषेचा जाणकार व्यक्ती अधिकारी म्हणून प्रत्येक आस्थापनेत /कारखान्यात असावा या संदर्भातील आदेशही या पूर्वीच दिले आहेत.
असे असताना काही ठिकाणी मराठी भाषेला जाणूनबुजून ठरवून नाकारण्याच काम काही नाठाळ करताना आढळून येत आहेत. असे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घेत अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला द्याव्यात. तसेच सर्व प्रकारचे अर्ज /निवेदने ही मराठीतून उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. या संदर्भात कुचराई झाल्यास आम्ही आपल्याला मनसे स्टाईल भेटू याची ही नोंद घ्यावी असे मनसेच्या वतीने बँकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बँकेच्या शाखाप्रमुखांना निवेदन देण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उप अध्यक्ष राजू सावळे, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अविनाश तरडे, संतोष यादव, आकाश सागरे, विक्रम भोसले, प्रदूत कांबळे, प्रज्वल गायकवाड, आकाश कांबळे, मनोज लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.













