अपघातग्रस्त पैलवान विजय डोईफोडे याला आमदार महेश लांडगेंची ‘साथ’

– पुण्यातील कमलनयन बजाज रुग्णालयात घेतली कुटुंबियांची भेट
– विजय मैदानात पुन्हा येईपर्यंत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –महाराष्ट्राचा उदयोन्मुख कुस्तीपटू विजय डोईफोडे याला गंभीर अपघात झाला. डोईफोडे कुटुंबियांना आधार देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी रुग्णालयात भेट दिली आणि सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पुण्यात झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्राचा उदयोन्मूख कुस्तीपटू पैलवान विजय डोईफोडे याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये राज्याला पदकांची कमाई करुन देणारा हा कुस्तीपटू अक्षरश: मृत्यूशी झुंज देत आहे. कुस्तीक्षेत्रात यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी पैलवान विजय डोईफोडे याची आज रुग्णालयात भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असतो. आमदार लांडगे म्हणाले की, एखादा पैलवान तयार करण्यासाठी कुटुंब आणि प्रशिक्षकांना २०-२० वर्षे कष्ट घ्यावे लागतात. विजयची प्रकृती पाहूण मन सुन्न झाले. त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि आपला हा पैलवान पुन्हा लाल मातीमध्ये मैदान गाजवण्यासाठी सज्ज व्हावा, अशी देवाकडे प्रार्थना करतो.
विजय मूळचा सातारा जिल्हयातील आहे. सांगली-सातारा- कोल्हापूर या भागात २०१९ मध्ये महापूर आला. त्यावेळी या भागातील पूरग्रस्तांसाठी आम्ही ‘‘एक हात मदतीचा’’ हा उपक्रम हाती घेतला होता. आज पुन्हा एकदा पैलवान विजयसाठी मदतीचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे. विजय पूर्णपणे बरा होवून पुन्हा मैदान गाजवेपर्यंत त्याच्या कुटुंबियासोबत खंबीरपणे उभा राहण्याचा निश्चय आम्ही केला आहे. पैलवान या नात्याने मी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहेच. समाजातील दानशूर व्यक्तींनीसुद्धा एक पाऊल पुढे यावे, अशी विनंती करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.













