अंतर्गत सुरक्षा बळकटीसाठी सैन्य व नागरी संस्थांचा संयुक्त सराव संपन्न
लष्कर, पोलीस, एनडीआरएफ व महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणांनी घेतला सहभाग

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध येथील शिवनेरी ब्रिगेडच्या पुढाकाराने अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने १० ते १५ मार्च २०२५ या दरम्यान पाच दिवसीय सैन्य-नागरिक समन्वय प्रशिक्षण व सराव शिबीराचे आयोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमात भारतीय लष्कर, महाराष्ट्र पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दहशतवादविरोधी पथक (एटीएस), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय पथक यांच्या सहभागाने संयुक्त प्रशिक्षण व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचा आढावा घेण्यात आला.
शिवनेरी ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर एस. तलुजा यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचा उद्देश नागरी आणि सैन्य प्रशासन यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करणे, कार्यक्षमता सुधारणा करणे आणि आपत्ती व्यवस्थापनासह विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करणे हा होता.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार, मिलिंद मोहिते यांच्या सहकार्याने आणि कर्नल रवी रंजन यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.
या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे सैन्य आणि नागरी संस्थांमधील समन्वय सुधारून कार्यक्षमता वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक मजबूत प्रतिसाद प्रणाली विकसित करणे हा होता. प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित प्रशिक्षणाद्वारे सहभागी संस्थांमधील समन्वय सुधारण्यावर यावेळी भर देण्यात आला तसेच दहशतवादविरोधी विविध परिस्थितींचे अनुकरण करून आपत्ती व्यवस्थापन आणि विविध संकटे आल्यानंतरचा आपत्कालीन यंत्रणांचा प्रतिसाद किती प्रभावी आहे याची चाचणी यावेळी घेण्यात आली.
अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकसंघ प्रयत्नांवर देण्यात आला भर
नागरिकांशी संवाद व सहकार्य अधिक दृढ करण्यावर या प्रशिक्षणात विशेष भर दिला गेला, ज्यामुळे अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकसंघ प्रयत्न शक्य होतील. राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासोबतच सर्व समाविष्ट संस्था एकत्र कार्यरत राहिल्यास नागरिकांचा विश्वास तर वाढतोच याशिवाय वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये सहकार्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास देखील मदत मिळते.
प्रशिक्षणामुळे सामूहिक तयारी आणि यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ होईल
या पाच दिवसीय यशस्वी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले. भविष्यात औंध येथील परदेशी प्रशिक्षण व सैन्य-नागरिक समन्वय प्रशिक्षण केंद्रात अधिक अशा सरावांचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे सामूहिक तयारी आणि यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ होईल, असे मत उपस्थित भारतीय लष्कर, महाराष्ट्र पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), दहशतवादविरोधी पथक (ATS), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.













